“स्वरभास्कर बैठक”….बैठक गाण्याची, बैठक गाण्यातल्या स्वरांची, बैठक स्वरांमागच्या विचारधारेची!
चौथा थिबा महोत्सव 21 ते 23 जानेवारी 2011 दरम्यान संपन्न झाला आणि 24 जानेवारी 2011 ला पंडित भीमसेन जोशींचं निधन झालं. थोर कलाकारांपासून ते सर्वसामान्य रसिकांपर्यंत सर्वानाच मोठा धक्का बसला. भारतीय शास्त्रीय संगीतातील भीमसेनजी हे एकमेव कलाकार असतील ज्यांना समीक्षकांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वत्र सारखच प्रेम मिळत होत. त्यांच्या संतवाणी, अभंगवाणी, राम श्याम गुणगान सारख्या रचना ऐकता ऐकता आपल्यासारखा सामान्य रसिक कधी सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचा वारकरी झाला हे आपल्यासुद्धा लक्षात आलं नाही. आपल्या गुरूंप्रती असलेली श्रद्धा व्यक्त करण्याच्या प्राथमिक उद्देशाने सुरु झालेली ही छोटेखानी मैफल बघता बघता संगीत पंढरी झाली. वैष्णव संप्रदायात विष्णूरूपाला विठ्ठलरूपामध्ये लोकप्रिय करण्यात भक्तराज पुंडलिकाची जी भूमिका आहे अगदी तीच भूमिका संगीत पंढरीत सवाई गंधर्वांना देवत्व मिळवून देण्यात ह्या भीमसेनरूपी पुंडलिकाची आहे हे निःसंशय!
भीमसेनजींनी गुरूंकडून खूप परिश्रमांती मिळवलेली संगीतविद्या प्रवाही ठेवली. अनेक शिष्य घडवले, कानसेन घडवले आणि त्याचबरोबर सवाई गंधर्व महोत्सवाचे गारुड बसलेले आपल्यासारखे अनेक कार्यकर्ते घडवले. आणि हेच पंडीतजींचं वेगळेपण होतं. काही चांगले शिष्य असतात, काही चांगले कलाकार असतात, त्यातले पुढे जाऊन काही चांगले गुरु होतात. पंडितजी शिष्योत्तम होते, सर्वोत्तम कलाकार होते, संगीताचार्य होते आणि त्याही पुढे जाऊन ते सर्वोत्कृष्ट आयोजक होते. आजच्या युगाच्या भाषेत बोलायचं झालं तर पंडितजी हे एक perfect Brand होते.
इतक्या महान कलाकाराला मानवंदना द्यायची तर ती त्याच्या कार्यकर्तृत्वाला साजेशी असावी ह्या भूमिकेतून आम्ही *स्वरांजली* ची संकल्पना मांडली. आणि अगदी मंडणगड पासून ते सावंतवाडी पर्यंतच्या सर्वच कलाकारांनी अगदी मनापासून ह्यामध्ये सहभागी होण्याची तयारी दाखवली कारण प्रत्येकाच्याच मनात होतं की आपणही काहीतरी करावं ह्या स्वरभास्कराला मानवंदना देण्यासाठी!
सगळी तयारी पूर्ण झाली आणि पंडितजींच्या निधनाच्या बरोबर 27 व्या दिवशी सकाळी 6 वाजता सुरु झालेली *स्वरांजली* 18 तासांनंतर रात्री 1 वाजता पूर्ण झाली. 54 कलाकारांनी आपापली कला पंडितजींचरणी अर्पण केली.आणि अगदी सकाळपासून ते संपेपर्यंत रसिकांनी सुद्धा ह्या उपक्रमात सहभागी होऊन पंडितजींप्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली.
उपक्रम झाल्यावर सर्व कलाकारांबरोबर झालेल्या चर्चेत अस लक्षात आलं की आपण जे शास्त्रीय संगीत शिकतो ते सादर करण्यासाठी स्वतःच असं कोणतंच व्यासपीठ उपलब्ध नाहीये. कारण जे गाण्याचे कार्यक्रम होतात त्यातली पहिली अट असते ती ‘ तुमचं शास्त्रीय का काय ते पहिली 10 मिनिट घ्या पण नंतर मात्र नाट्यसंगीत झालं पाहिजे.’ मग जे आपण गुरूंकडून शिकतोय ते किती कळलंय आणि त्यातलं किती आपण मांडू शकतो हे कळण्यासाठीचं स्टेज कुठाय आपल्याकडे? त्यातूनच मग दरवर्षी स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करून बघता यावी ह्यासाठी एका उपक्रमाची सुरुवात करावी असं ठरलं. त्यामुळे कलाकाराला व्यक्त होण्यासाठी, गुरूंकडून मिळालेली विद्या आणि गुरूंचं नाव प्रवाही ठेवण्यासाठी एक व्यासपीठ तर मिळेलच पण त्यामुळे आपल्यासारख्या कानसेनांच्या ज्ञानात भर पडायला मदत पण होईल असा दुहेरी हेतू ह्या उपक्रमामागे होता. उपक्रमाला नाव द्यायचं ठरलं ‘ बैठक ‘ पण ज्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण थिबा महोत्सव सुरु केला त्या भीमसेनजींचं कायम स्वरूपी स्मरण रहावं ह्या उद्देशाने नाव ठरवलं….. *स्वरभास्कर बैठक*….बैठक गाण्याची, बैठक गाण्यातल्या स्वरांची, बैठक स्वरांमागच्या विचारधारेची! 2012 ला सुरु झालेला हा प्रवास ह्यावर्षी पाचव्या टप्प्यावर आलाय. गेल्या पाच वर्षात अनेक स्थानिक कलाकारांनी स्वतःला पारखून घेतलं. त्यात पाहुण्या कलाकारांची पण भर पडत गेली. स्थानिकांबरोबर बाहेरील एका कलाकाराला बोलवायला सुरुवात केली ती सांगीतिक आदानप्रदान व्हावं ह्या हेतूने! कलाकारांइतकाच चांगला प्रतिसाद रसिकांकडून मिळतोय. त्यामुळे स्थानिक कलाकारांच्या सादरीकरणामध्ये होत असलेली गुणात्मक वाढ ही लक्षणीय आहे. *बैठक* पक्की होतेय हेच त्यातून लक्षात येतंय. अजून खूप पल्ला गाठायचाय! कारण ह्या संकल्पनेतच एका मोठ्या महोत्सवाची बीज सामावलेली आहेत. असं वाटतं की इतके स्थानिक कलाकार तयार व्हावेत की औंधला साजऱ्या होणाऱ्या महोत्सवासारखी *स्वरभास्कर बैठक* सुद्धा रात्रभर चालावी, कोकणातले सगळे कलाकार एका रात्रीसाठी एकत्र असावेत आणि गाऊन झाल्यावर गप्पा सुद्धा फक्त गाण्याच्याच व्हाव्यात.
Mindcare Clinic For Mental And Sexual Health
Ved Electricals
India Mobile Technologies
Gharkul Ruchi Restaurant
Upayukta Bhandar
Jai medicals
Million Smiles Multi Speciality Dental Clinic
RTECH Engineering Classes
Zadgoan Sport Ground
Samsung Smart Cafe
© Online Konkan